चालत्या अल्टो कारला गवा रेड्याची धडक.....महिला जखमी
दोडामार्ग
सासोली येथील तिलारी कालव्या नजीक दोडामार्ग-बांदा मुख्य रस्त्यावर चालत्या अल्टो कारला गवा रेड्याने अचानक धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात गाडीचे देखील हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.दोडामार्गहुन हे कुटुंब आपल्या अल्टो कारने मोरगाव येथे जत्रेसाठी जात होते. सासोली परिसरातील तिलारी कालव्याजवळ गाडी आली असता, अचानक एका गवा रेड्याने धावत्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर गवा रेडा थेट गाडीच्या समोरच्या काचेवर आणि दरवाजावर आदळला. धडकेच्या प्रभावाने गवा रेडा शेजारील गटारात कोसळला, मात्र काही वेळातच तो तिथून उठून जंगलाच्या दिशेने पसार झाला.या अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला असून समोर बसलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सासोली येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. जखमी महिलेला तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोडामार्ग-बांदा मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
konkansamwad 
