कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला महाराष्ट्र शासनाचा ‘जिल्हा युवा पुरस्कार’ जाहीर

सिंधुदुर्ग


      देशाच्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापनदिन साजरा होत असताना, समाजाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि युवक विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थेला जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.१५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मा. श्री. नितेश नारायण राणे , मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे,   जिल्हा क्रीडा अधिकारी,  पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग  डॉ. श्री. मोहन दहिकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री. रवींद्र खेबुडकर आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि समान संधीने जगता यावे, यासाठी आपण समाजासाठी काय योगदान देतो, याचा विचार करण्याचा दिवस आहे.याच विचारातून गेल्या १५ वर्षांपासून कोकण कला व शिक्षण विकास संस्था समाजातील गरजू, वंचित आणि ग्रामीण घटकांसाठी कार्यरत आहे. शिक्षणापासून महिला सक्षमीकरणापर्यंत, युवक विकासापासून ग्रामविकासापर्यंत तसेच पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या विविध क्षेत्रांत संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांद्वारे विद्यार्थी, महिला, युवक आणि ग्रामीण समुदायांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा सन्मान नसून, समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, स्वयंसेवकाचा, दात्याचा आणि संस्थेसोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे.स्वातंत्र्याच्या अमृत प्रवासात समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळावी, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, युवकांना योग्य दिशा मिळावी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने कोकण संस्थेची सामाजिक वाटचाल सुरू आहे.१५ ऑगस्ट रोजी मिळणारा हा पुरस्कार संस्थेसाठी अभिमानाचा क्षण असला, तरी त्याहून मोठी जबाबदारी घेऊन अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या या सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुरस्कार संस्थेच्या १५ वर्षांच्या सामाजिक कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण शासकीय पावती असून, भविष्यात अधिक व्यापक, परिणामकारक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी तो निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.