अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ च्या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सुरू.....महाडीबीटीवर लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ च्या शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सुरू.....महाडीबीटीवर लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन

 

सिंधुदुर्ग


      अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजना यांसारख्या योजनांचे नवीन अर्ज, नूतनीकरण व नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने केले आहे. विद्यार्थ्यांनी https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. यंदा आधार क्रमांकाच्या आधारे नव्याने महाआयडी तयार करणे बंधनकारक असून जुन्या पोर्टलवरील यूजर आयडी-पासवर्डची आवश्यकता नाही. आधार पोर्टलवरील पत्ता, मोबाईल, ईमेल व बँक खाते ही माहिती अचूक व अद्ययावत ठेवावी. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, गुणपत्रके आदी कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत. जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेऊन याबतची माहिती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करावी. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रवेश प्रक्रियेचा अनिवार्य भाग म्हणून प्राधान्याने पूर्ण करावी, नूतनीकरणाच्या अर्जांना प्राधान्य द्यावे आणि कोणतेही अर्ज प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत मंजूर करावेत. तसेच महाविद्यालयांनी प्रवेशावेळी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शिक्षण अथवा परीक्षा शुल्क आकारू नये आणि आपली प्रोफाईल व शुल्क रचना तात्काळ अद्ययावत करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.