विद्यावेतन नाही, तर काम नाही; सिंधुदुर्गात ११२ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंदोलन....आरोग्यसेवा कोलमडण्याची भीती
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ११२ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी गेल्या दोन महिन्यांचे विद्यावेतन थकल्यामुळे शुक्रवारपासून 'विद्यावेतन नाही, तर काम नाही' अशी आक्रमक भूमिका घेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे, महाविद्यालयात बाह्य संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या सुमारे साडेचारशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही (वर्ग ३ व वर्ग ४) वेतन गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून रखडले आहे. यामध्ये लिपिक, सफाई कामगार आणि कक्षसेवक यांसारख्या विविध कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप जमा झाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, येत्या दोन दिवसांत वेतन जमा न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या या पवित्र्यामुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवेवर आणि रुग्णालयातील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण विषयाबाबत महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, संबंधित कंत्राटदार संस्थेशी चर्चा झाली असून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन लवकरच अदा केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
konkansamwad 
