लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक - परशूराम उपरकर
कणकवली
महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी महिलांना आकर्षित करण्यासाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा घोटाळा समोर आला आहे. योजनेच्या KYC प्रक्रियेत ५१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या लाभार्थ्यांकडून आता वसुली केली जाणार असल्याने सरकारने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. तसेच पेट्रोल आणि गॅसचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून गरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले असल्याचेही ते म्हणाले.कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लाकडी बहिण योजनेचा २१ हजार शासकीय आणि निमशासकीय महिलांनीही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. शिवाय १६ हजार पुरुष लाभार्थी आढळले असून, त्यांच्याकडून आता वसुली करण्यात येणार आहे.ते म्हणाले, "निवडणुकीच्या काळात काळा पैसा वाटण्याऐवजी लाडकी बहीण योजनेद्वारे 'व्हाईट' पैसा वाटून महिलांच्या मतांचा सुपाडा केला. आता महागाईच्या खाईत महिलांना लोटण्याचे काम सरकार करत आहे. घरगुती गॅस सिलिंडर, कडधान्य, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शाळा सुरू झाल्याने वह्या, पुस्तके आणि ड्रेसची खरेदी करताना महिलांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे."ते म्हणाले, एका बाजूला सरकार महिलांना १५०० रुपये देत आहे, तर दुसरीकडे महागाईमुळे प्रत्येक महिलेकडून तीन हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम वसूल करत आहे. सोन्याचे भाव दीड लाख आणि चांदीचे दोन लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. राज्यात सर्वत्र महागाईचे थैमान आहे. सरकारने लाखो कोटींचे कर्ज घेतले असून, जनता आता संतापली आहे.सरकार जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. शासन यंत्रणा कोलमडली आहे. गरीबांना अधिक गरीब आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याचे धोरण अवलंबले जात आहे, असा गंभीर आरोप उपरकर यांनी केला.
konkansamwad 
