सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून वैभव नाईक आक्रमक....जाब विचारताच नागरिकांची कामे पूर्ण

सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून वैभव नाईक आक्रमक....जाब विचारताच नागरिकांची कामे पूर्ण

 

कणकवली


     कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची होणारी गैरसोय पाहून कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना कडक शब्दांत जाब विचारल्यानंतर रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांची कामे सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली.  
     कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरू ठेवल्याने आज सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची मोठी रांग लागली होती. त्याचवेळी माजी आमदार वैभव नाईक तहसील कार्यालयात गेले असता त्यांनी नागरिकांची होणारी गैरसोय पाहून संताप व्यक्त केला.दुपारी 2 वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जातो, असे नागरिकांनी सांगताच वैभव नाईक यांनी व्यवस्थापक पावसकर यांना "रांगेत असलेल्या सर्वांची कामे पूर्ण होईपर्यंत केंद्र बंद करायचे नाही" असा कडक इशारा दिला.प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांची एवढी मोठी रांग लागूनही *कणकवलीचे तहसीलदार केबिनमध्ये बसून ए.सी.ची हवा घेत आहेत. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत असे त्यांना वाटत नाही*, असे सांगत वैभव नाईक यांनी तहसीलदारांवर नाराजी व्यक्त केली. तहसीलदार मात्र शेवटपर्यंत गर्दीच्या ठिकाणी फिरकलेही नाहीत, त्याबद्दल नागरिकांनीही रोष व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक म्हणाले, "अनेक गावांतून नागरिक सकाळी 9 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. ही रांग शौचालयाच्या बाजूला ठेवल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सेतू सुविधा केंद्राचा व्यवस्थापकही ए.सी.मध्ये बसला होता. महसूल विभाग घरपोच सेवा देणार असे सांगतो, पण प्रत्यक्षात नागरिकांना चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत." वैभव नाईक यांनी "तुम्ही काय उपाययोजना केली हे पाहण्यासाठी मी पुन्हा 3 वाजता येणार" असे सांगितल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळपर्यंत पूर्ण करून देण्यात आले. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.वैभव नाईक यांनी महसूल विभागाने आधी ही परिस्थिती सुधारावी आणि नागरिकांना ताटकळत थांबावे लागू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना व्यवस्थापक पावसकर यांना दिल्या.