कुडाळ पंचायत समितीतून रोड रोलर गायब प्रकरणी कडक कारवाई....कनिष्ठ सहाय्यक अधिकारी निलंबित
कुडाळ
कुडाळ पंचायत समितीच्या आवारातून शासकीय रोड रोलर अचानक गायब झाल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक शिल्पा वासुदेव वेंगुर्लेकर उर्फ दीक्षा दत्ताराम माळकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.20 वर्षांपासून धूळ खात पडलेला रोड रोलर गायब संबंधित रोड रोलरचे सन 2005 मध्येच निर्लेखन म्हणजेच स्क्रॅप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरची पुढील लिलाव प्रक्रिया वेळेत न राबविल्यामुळे हा रोड रोलर तब्बल 20 वर्षांपासून पंचायत समितीच्या आवारातच धूळ खात पडून होता. दोन महिन्यांपूर्वी हा शासकीय रोड रोलर आवारातून अचानक गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.हा संवेदनशील मुद्दा कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत आणि जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या चौकशीत संबंधित रोलरची संपूर्ण जबाबदारी कनिष्ठ सहाय्यक दीक्षा माळकर यांच्यावर निश्चित करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 मधील कलम 3 अन्वये त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.निलंबन काळात त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शासकीय मालमत्तेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
konkansamwad 
