ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेंचे जाचक नियम शिथिल.....२० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आता मिळणार ३ शिक्षक

ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेंचे जाचक नियम शिथिल.....२० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आता मिळणार ३ शिक्षक

 

कणकवली

 

     सिंधुदुर्ग आणि कोकणासह राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाळांसमोर उभा असलेला पटसंख्येचा जाचक निकष आता शिथिल करण्यात आला असून, ९ वी आणि १० वीच्या वर्गाची एकत्रित विद्यार्थी संख्या २० असल्यास तिथे ३ शिक्षक मंजूर केले जाणार आहेत.पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला होता. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा होऊन आता या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि शिक्षकांची कमतरता भासू नये, या उद्देशाने सरकारने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, ही विशेष सवलत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लागू असेल.ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्यांना आपली विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून एका वर्षासाठी ही मुभा देण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना होणार असून, यामुळे दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षक कपातीचे संकट टळले आहे.संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. विशेषतः कोकणच्या दुर्गम भागातील माध्यमिक शाळांना यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.