'थार'ची स्टंटबाजी तरुणाला भोवली

'थार'ची स्टंटबाजी तरुणाला भोवली

मालवण

 

     मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या स्टंटबाजीचा एक अतिशय धक्कादायक आणि थरारक प्रकार घडला. आज दुपारी दांडी समुद्रकिनाऱ्यावर एक पर्यटक तरुण आपल्या थार गाडीसह धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करत होता. त्याच वेळी एक स्थानिक युवती किनाऱ्यावरून जात असताना, या वेगवान थार गाडीची तिला जोरदार धडक बसणार होती. मात्र, सुदैवाने ती या अपघातातून बालबाल बचावली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या युवतीने त्या तरुणाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.आपल्या कृत्यामुळे तरुण प्रचंड घाबरला. त्याने पोलिसांच्या आणि गर्दीच्या भीतीने आपली थार गाडी थेट पद्मगड किनाऱ्याच्या दिशेने वेगाने पळवली. त्या तरुणीने आणि काही स्थानिक पर्यटन व्यवसायिकांनीही त्याचा पाठलाग करत पद्मगडच्या दिशेने धाव घेतली. मात्र, स्वतःला घेरले गेलेले पाहून त्या थार चालकाने गाडी पद्मगड किनाऱ्यावरच उभी केली आणि थेट अथांग समुद्रात उडी घेतली.तरुणाने समुद्रात उडी घेतल्यानंतर तो सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात पोहत पुढे चालला होता. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती मालवण पोलिसांना दिली. तसेच समुद्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या किल्ला होडी व्यवसायिकांनाही याबाबत सतर्क केले. माहिती मिळताच समुद्रातून जात असलेल्या होडी व्यवसायिकांनी त्या तरुणाला पोहताना पकडले आणि सुरक्षितपणे आपल्या होडीत घेतले.होडी व्यवसायिकांनी त्या तरुणाला होडीतून मालवण बंदर जेटी येथे आणले. तोपर्यंत पोलीस दल जेटीवर हजर झाले होते. पोलिसांनी तात्काळ त्या पर्यटक तरुणाला बंदर जेटीवरून ताब्यात घेऊन मालवण पोलीस ठाण्यात नेले. तसेच पद्मगड किनाऱ्यावर लावलेली त्याची थार गाडीही पोलिसांनी जप्त केली. किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या अशा जीवघेण्या स्टंटबाजीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांमधून होत आहे.