सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट

सावंतवाडीतील ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट

सावंतवाडी

 


     येथील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाचा संपूर्ण कायापालट होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून हा परिसर पर्यटनाचे आणि सौंदर्यीकरणाचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.या बैठकीला आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, वास्तुविशारद स्वरा पोयरेेकर, अजय नायक आणि श्रद्धा कदम प्रामुख्याने उपस्थित होते. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी शासन आणि राजघराण्याने एकत्र येऊन केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे उत्तम प्रतीक असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.आजच्या आधुनिक काळात पारंपरिक शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन 'थर्ड स्वेअर' आणि 'आरजेबी-सीपीएल' (रतन जे. बटलीबॉय कन्सल्टंट्स प्रा. लि.) यांनी त्यांचे पर्यावरण भागीदार 'एझ्युकेटेड एन्व्हायर्नमेंट' (इडेन एलएलपी) यांच्या सोबतीने हा सर्वसमावेशक विकास आराखडा सादर केला. हा संपूर्ण प्रकल्प 'लोकांसाठी, जागेसाठी आणि पाण्यासाठी' अशा तीन मुख्य मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे.मोती तलाव हा ऐकेकाळी शहरातून वाहणाऱ्या पाण्याचा मुख्य नैसर्गिक साठा होता. त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून तलावाच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे, पाणी स्वच्छ करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि तलावाच्या संरक्षक भिंतीचे मजबुतीकरण करणे यावर प्रस्तावात विशेष भर देण्यात आला आहे.स्थानिक संस्कृतीचे जतन करत जागतिक पर्यटनाला शाश्वत पद्धतीने आकर्षित करणे हे या प्रकल्पाचे अंतिम उद्दिष्ट आहे. यासाठी *फूड पार्क, नौकाविहार सुविधा, उत्सव प्लाझा व पारंपरिक घाट, दशावतार नाटक आणि इतर स्थानिक कलाप्रकारांसाठी खुलं नाट्यगृह* विकसित केले जाईल. संपूर्ण तलाव परिसर पारंपरिक घाटांच्या संकल्पनेवर आधारित शांत व निसर्गरम्य बनवला जाईल.एकंदरीत, मोती तलावाचे हे प्रस्तावित पुनरुज्जीवन सावंतवाडीच्या प्रगतिशील भविष्याची दिशा दर्शवणारे ठरेल. हा प्रकल्प ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक विकास, स्थानिक समुदाय आणि पर्यटन, तसेच पर्यावरणीय जबाबदारी आणि आर्थिक संधी यांचा सुंदर समतोल साधणारा ठरणार आहे.