सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी अरविंद मोंडकर यांची निवड

सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी अरविंद मोंडकर यांची निवड

मालवण 


      अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसच्या 'संघटन सृजन अभियाना' अंतर्गत देशभरातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची धुरा मालवण येथील खंबीर आणि अनुभवी नेते अरविंद मोंडकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.या संदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने त्यांना पाठविण्यात आले आहे.देशातील लोकशाही आणि संविधान अधिक मजबूत करण्यासाठी, तसेच सर्वमान्य असे गांधी-नेहरू यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून ते अधिक दृढ करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने माझ्यावर ही मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात गतवैभव मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करण्याची संधी मला मिळाली आहे. असे श्री. मोंडकर यांनी सांगितले.ते म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेतृत्व, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमय करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.अरविंद मोंडकर यांच्या या नियुक्त्तीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.