कणकवलीच्या पोलीस उपअधीक्षकांचा सेवानिवृत्तीपूर्वी अनोखा आदर्श....भव्य शिबिरात ६० जणांचे रक्तदान, ५६ जणांची मोफत आरोग्य तपासणी.
कणकवली
"पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना अनेकदा रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय घनश्याम आढाव यांनी जवळून अनुभवली. त्या जाणिवेतूनच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी या भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. सामाजिक बांधिलकी म्हणजे काय, हेच आढाव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले असून हा उपक्रम पोलीस दलासाठी निश्चितच अनुकरणीय आहे," असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी काढले. कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कणकवली आणि सिंधुरत्न रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावे या उद्देशाने आयोजित या शिबिरात स्वतः पोलीस उपअधीक्षक घनश्याम आढाव यांनीही रक्तदान करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कौतुकास्पद उपक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये एकूण ६० जणांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली, तर ५६ जणांची शुगर, रक्तदाब, ईसीजी, थायरॉईड तसेच महिलांच्या आवश्यक आरोग्य तपासण्यांसह विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक संदेश देत प्रत्येक रक्तदात्याला 'सोनचाफ्याचे रोप' भेट देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि पोलीस उपअधीक्षक नयोमी साटम यांनी या शिबिराला विशेष भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. समीरा रावराणे, सिंधुरत्न रक्तमित्र प्रतिष्ठानचे मकरंद सावंत, सुशील परब, विनू महाडिक यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, आचराचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, विजयदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या पोलीस दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
konkansamwad 
