युवकांच्या आत्महत्यांच्या प्रसिद्धी ऐवजी हवी योग्य समूपदेशकाची साथ - दयानंद कुबल
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वाढत्या युवकांच्या आत्महत्यांच्या घटनांना प्रसारमाध्यमांनी कृपया अनावश्यक प्रसिद्धी देण्याऐवजी या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी आपण समुपदेशक म्हणून कशी जबाबदारी हाती घेऊ शकतो यावर विचार करावा, असे अत्यंत भावनिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी केले आहे. अशा संवेदनशील घटनांची सतत व ठळक प्रसिद्धी केल्यामुळे काही युवकांमध्ये नकारात्मक विचार वाढण्याची शक्यता निर्माण होते, तसेच ही प्रवृत्ती नकळतपणे विकृतीत बळावण्यासही हातभार लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.त्यामुळे काही बातम्यांकडे फक्त बातमी म्हणून विचार न करता समाजहिताला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. आत्महत्यांच्या बातम्या अतिरंजित स्वरूपात, तपशीलवार किंवा वारंवार दाखवल्यास त्याचे दुष्परिणाम समाजावर विशेषतः तरुणांवर होऊ शकतात. काही वेळा अशा बातम्यांमुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या युवकांवर विपरीत परिणाम होऊन तेही अशाच टोकाच्या निर्णयांकडे वळू शकतात.मानसिक आरोग्य तज्ज्ञ व समुपदेशकांच्या मते, आत्महत्यांच्या घटनांचे सनसनाटीकरण टाळणे आवश्यक आहे. त्याऐवजी सकारात्मक उदाहरणे, संकटांवर मात केलेल्या व्यक्तींच्या कथा, तसेच उपलब्ध समुपदेशन सेवा व मदत केंद्रांची माहिती यांना प्रसिद्धी देणे अधिक उपयुक्त ठरते. युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, संवाद साधणे आणि योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलता राखून अशा घटनांकडे पाहण्याची गरज आहे. माध्यमांनी जबाबदारीने व संतुलित पद्धतीने वृत्तांकन केल्यास समाजात सकारात्मक संदेश जाऊन युवकांना योग्य दिशा मिळू शकते.
konkansamwad 
