बलिदानाची ज्वाला, स्वाभिमानाचा उजेड ....मळगावमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची तेजस्वी ज्योत
सावंतवाडी
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाला वंदन करण्यासाठी स्वराज्यनिष्ठेचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा जागवणारा प्रेरणादायी उपक्रम मळगाव येथे साकारला जात आहे. जिल्हा परिषद शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासला १८ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. हा बलिदान मास १८ मार्चपर्यंत अखंडीतपणे सुरू राहणार आहे.धर्मासाठी झगडणारा राजा तलवारीपेक्षा तेजस्वी ठरतो,” अशा विचारांचा वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रमी जीवन, अपार त्याग आणि अतुलनीय बलिदान हे आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरावे, या उद्देशाने मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीत इतिहासाबद्दल जागृती निर्माण व्हावी, स्वाभिमान, निष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना दृढ व्हावी, तसेच राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, हा या बलिदान मासाचा मुख्य हेतू आहे.या निमित्ताने दररोज प्रमाणे काल सायंकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र तसेच राष्ट्रनिष्ठा जागवणारे संदेश देण्यात आले असून इतिहासातील बलिदानाचे महत्त्व, स्वराज्यनिष्ठा, स्वाभिमान आणि देशसेवेचे मोल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमात शिवशंभू ग्रुप, मळगावचे सदस्य उत्स्फूर्त सहभाग घेत असून मळगावसह परिसरातील नागरिकांचा प्रतिसादही उल्लेखनीय आहे. बलिदान मासात सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार व्हावे आणि राष्ट्रप्रेरणेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशंभू ग्रुप मळगावच्यावतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
