लोकनेत्याचा सन्मान!....शाखाप्रमुख ते केंद्रीय मंत्री...नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा दिमाखदार सोहळा!
कणकवली
महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे साहेब म्हणजे एक असे धडाडीचे नेतृत्व आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी संसदीय कारकीर्द बहरली. माझ्या पहिल्याच भाषणाला चिठ्ठी पाठवून त्यांनी दिलेली शाबासकी आजही माझ्या स्मरणात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कणकवली येथे आयोजित राणे यांच्या 'अमृत महोत्सवी' वर्ष पदार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांच्या प्रशासकीय कौशल्याचे पैलू उलगडताना सांगितले की,अर्थसंकल्पावर बोलताना राणे साहेब एखाद्या निष्णात अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकडेवारीची चिरफाड करायचे, ज्यामुळे संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. "मी लिहिलेल्या 'बजेट कसं वाचावं' या पुस्तकाच्या प्रेरणेचे श्रेयही राणे साहेबांच्या कार्यपद्धतीलाच जाते," असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. राणे यांच्या कामातील 'शिस्त' आणि 'क्वालिटी'चे दर्शन सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजमधून घडते, असे सांगत त्यांनी राणे यांच्या कुटुंबियांच्या योगदानाचाही गौरव केला. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे खासदार नारायण राणे यांच्या जीवनपटावर आधारित ‘तुफान’ या देखण्या 'कॉफी टेबल बुक'चे प्रकाशन. मुख्यमंत्री आणि उपस्थित दिग्गज नेत्यांच्या हस्ते हे प्रकाशन पार पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राणे यांच्या लढाऊ बाण्याचा गौरव करताना सांगितले की, राजकीय जीवनात अनेक वादळे आली, पण राणे साहेबांनी कधीही हार मानली नाही. उलट प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली. एक आदर्श विरोधी पक्षनेता कसा असावा, याचे ते उत्तम उदाहरण असून नवीन सदस्यांनी त्यांच्या भाषणांचा अभ्यास करायला हवा. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राणे यांच्याबद्दलची आत्मीयता व्यक्त करताना सांगितले की, कोकणच्या या वाघाच्या धाकातही माया आहे आणि कोकणवासीयांनी त्यांना आपल्या कुटुंबातील प्रमुख मानले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी राणे यांच्या वरवडे ते दिल्ली या थक्क करणाऱ्या प्रवासाचा उल्लेख करत, सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची नवी ओळख दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद राणे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे मिळत असल्याचे नमूद केले. या गौरव सोहळ्याला उत्तर देताना नारायण राणे भावूक झाले होते. ते म्हणाले की, "मी आयुष्यात जे काही मिळवले, ते कोणाच्या मेहरबानीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर आणि अपार कष्टावर मिळवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हेच माझ्या आयुष्याचे प्रेरणास्थान राहिले असून, संकटं आली तरी मी कधीच हार मानली नाही. आजचा हा सन्मान माझ्यासाठी आयुष्यभराची अमूल्य संपत्ती आहे." या सोहळ्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार दीपक केसरकर, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, तर पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले.
konkansamwad 
