गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर बंदी; १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मनाई आदेश लागू
सिंधुदुर्गनगरी, दि. ५
गणेशोत्सव काळात मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वाढता वापर लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात दि. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या सार्वजनिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हा मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. १४ सप्टेंबर रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते २५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.गणेशोत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्तीचे आगमन, विसर्जन मिरवणुका आणि सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या लेझर लाईटच्या झोतामुळे वृद्ध, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आला आहे.दरम्यान, या कालावधीत काही अपरिहार्य कारणासाठी लेझर लाईटचा वापर करायचा असल्यास पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ सह इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
konkansamwad 
