मिठमुंबरी समुद्रात पर्यटक युवक बुडाला

मिठमुंबरी समुद्रात पर्यटक युवक बुडाला

देवगड

 

     सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून देवगड येथे आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपवर काळाने घाला घातला. मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक जण समुद्रात बुडाला यात तिघांना वाचवण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले. चैतन्य राजेंद्र गुरव (वय २२, मूळ रा. दादर नायगाव, मुंबई) असे पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद (वय २०, मूळ रा. दादर नायगाव) याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ देवगड ब्राह्मणदेववाडी येथील रहिवासी असलेला यश राजेंद्र उपरकर (वय २१) हा सध्या दादर नायगाव येथे राहतो. सुट्टीनिमित्त तो आपले मुंबईतील मित्र ओम दीपक चव्हाण (वय १७), चैतन्य राजेंद्र गुरव, सोहम जयेश मंडोद आणि अर्णव राजेश तारी (वय २०) यांच्यासह गावी आला होता. रविवारी सायंकाळी हे पाचही जण मिठमुंबरी बागवाडी किनाऱ्यावर गेले होते. यश उपरकर याने आपल्या मित्रांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला दिला होता, मात्र मित्रांनी पोहण्याचा हट्ट धरला. यश किनाऱ्यावरच थांबला, तर उर्वरित चौघे पाण्यात उतरले. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले आणि त्यांनी वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली.युवकांचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी व मच्छिमार रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी, मनीष रमेश तारी, बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बाबूराव धुरी व बाळा राजम यांनी जीवाची पर्वा न करता नौकेसह समुद्रात जात बुडणाऱ्या युवकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी अथक प्रयत्नांनंतर ओम चव्हाण, सोहम मंडोद आणि अर्णव तारी यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. यातील सोहम मंडोद हा बेशुद्ध पडल्याने त्याला किनाऱ्यावर तातडीने कृत्रिम श्वासोच्छवास देऊन शुद्धीवर आणण्यात आले. त्याला आधी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, यादरम्यान चैतन्य गुरव हा पाण्यात दिसेनासा झाला. मच्छिमारांनी नौकांच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली, पण त्याचा पत्ता लागला नाही. विशेष म्हणजे, बुडणाऱ्या चैतन्य गुरव याला चांगले पोहता येत होते, तरीही तो पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचे स्थानिकांनी सांगितले. सध्या पर्यटन हंगाम असल्याने देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. ही घटना घडली तेव्हाही किनाऱ्यावर अनेक पर्यटक उपस्थित होते. परंतु, तरुण बुडत असताना आणि मदतीसाठी याचना करत असताना बहुतांश पर्यटकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. स्थानिक मच्छिमारांनी तातडीने धाडस दाखवले नसते तर आणखी मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे मिठमुंबरी सारख्या गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यावर एकही सुरक्षारक्षक तैनात नसल्याची बाब समोर आली असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव, स.पो. उपनिरीक्षक प्रवीण सावंत आणि पो.कॉ. प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व तपास सुरू केला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.