युवा शक्तीला नेतृत्वाची दिशा; तुळस येथे युवक-युवती नेतृत्व शिबिर उत्साहात

युवा शक्तीला नेतृत्वाची दिशा; तुळस येथे युवक-युवती नेतृत्व शिबिर उत्साहात

तुळस 


      वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कोकण विकास संस्था, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने WeLead उपक्रमांतर्गत आयोजित युवक-युवती नेतृत्व शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या हस्ते श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथील कर्मयोगी रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृहात उत्साहात झाले.या शिबिरास युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचे मुख्याध्यापक विनायक कोल्हे, प्रगती चव्हाण, संदीप तुळसकर, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, महेश राऊळ, अश्विनी चव्हाण, संजना तुळसकर, सोनाली नाईक, बबन घोडे-पाटील आदी उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी प्रगती चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्थेतील युवक-युवतींची भूमिका, नेतृत्वगुण तसेच ताण-तणाव व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, गावाच्या विकासाच्या निर्णयप्रक्रियेत युवक-युवतींचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पंचायत राज व्यवस्था ही लोकशाहीच्या मुळाशी जोडलेली व्यवस्था असून, युवकांनी ग्रामसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या गावाच्या विकासात योगदान दिले पाहिजे.त्या पुढे म्हणाल्या, नेतृत्व म्हणजे केवळ पद मिळवणे नव्हे, तर संकटाच्या काळात योग्य निर्णय घेणे, इतरांना सोबत घेणे आणि समाजाच्या हितासाठी जबाबदारी स्वीकारणे होय. मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला युवकच प्रभावी नेतृत्व करू शकतो.पंचायत समितीचे सभापती शंकर घारे म्हणाले, युवक-युवती हे देशाचे भविष्य असून त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि संधी मिळणे आवश्यक आहे. युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि नवीन काही करण्याची क्षमता असते. या ऊर्जेला योग्य दिशा मिळाल्यास गाव, समाज आणि देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होऊ शकते.शिबिरामध्ये युवक-युवतींमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, ताण-तणाव व्यवस्थापन, सामाजिक जबाबदारी, टीमवर्क तसेच स्थानिक विकासामधील युवकांची भूमिका याबाबत विविध उपक्रम आणि मार्गदर्शन करण्यात आले.नेतृत्वाची सुरुवात... बदलाची वाटचाल! या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया वराडकर यांनी केले, तर आभार वैष्णवी परूळकर यांनी मानले.