महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ देवरूखात महाविकास आघाडीतर्फे जंगी प्रचार रॅली.
रत्नागिरी.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ संगमेश्वर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज रविवारी देवरूख शहरातून प्रचार रँली काढण्यात आली. या रँलीतून महाविकास आघाडीने एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस हे पक्ष एकदिलाने महाविकास आघाडीच्या वतीने जोरदारपणे करत आहेत. प्रचाराचा आज रविवारी शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी देवरूख शहरातून प्रचार रँली काढण्यात आली. या प्रचार रँलीला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरूवात करण्यात आली. यावेळी विनायक राऊत तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
ही रँली बसस्थानक मार्गे बाजारपेठ, माणिक चौक, मातृमंदिर चौक पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत नेण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व रँलीची सांगता करण्यात आली. महाविकास आघाडीच्या या प्रचार रँलीत माजी राज्यमंत्री रविंद्र माने, ठाकरे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम, ठाकरे गट युवासेनेचे राज्य सहसचिव प्रद्युम्न माने, माजी जि. प. अध्यक्ष व ठाकरे गटाचे युवानेते रोहन बने, ठाकरे गटाचे संंगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरूकर, संतोष लाड, ठाकरे गटाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क संघटक नेहा माने, रत्नागिरी जिल्हा संघटक वेदा फडके, संंगमेश्वर तालुका संघटक स्मिता लाड, देवरूख शहर संघटक निलम हेगशेट्ये, वैभव पवार, इस्त्याक कापडी, बाबू मोरे, दादा शिंदे, युवासेनेचे तेजस भाटकर, छोट्या गवाणकर, बाळा कामेरकर, अमर गवाणकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, संंगमेश्वर तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरूख शहराध्यक्ष निलेश भुवड आदिंसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.