प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

 

 

पुणे



      विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करत, एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. पुणे येथे एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उपस्थित होत्या.बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच  उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले, एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील काम आव्हानात्मक होते. भौगोलिक, सामाजिक आणि प्रशासकीय परिस्थितीनुसार विविध अडचणी निर्माण झाल्या; मात्र या अडचणी दूर करून जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकांनी चांगले काम केले असून, निर्धारित कालावधीत हाऊस-टू-हाऊस सर्व्हे पूर्ण केला आहे. याबद्दल त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.पहिला टप्पा हा निवासी स्थितीची पडताळणी तर पुढील टप्प्यात प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीचे नियोजन आवश्यक आहे. नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही आणि क्षेत्रीय अधिकारी व बीएलओ यांच्यावरही अनावश्यक ताण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे घेऊन पडताळणी करावी.  कायदेशीर तरतुदी आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. नोटीस बजावणी, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक पडताळणी यासाठी इतर राज्यांमध्ये अवलंबिलेल्या चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पद्धत स्वीकारता येईल. उपलब्ध मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्र तसेच इतर वैध ओळखपत्रांच्या माध्यमातून संपर्क व पडताळणीची प्रक्रिया सुलभ करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात जिल्हास्तरीय सोशल मीडिया पथक, प्रसारमाध्यमांशी संबंधित यंत्रणा आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सक्रिय राहून नागरिकांना प्रक्रियेबाबत अचूक माहिती द्यावी. विविध श्रेणीतील मतदारांची संख्या, त्यांच्या बाबतची पुढील कार्यवाही तसेच हरकती व सुनावणीच्या प्रक्रियेबाबत स्पष्ट  संदेश देण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद आणि इतर श्रेणीतील नोंदींबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.डॅशबोर्डवर दररोज उपलब्ध होणाऱ्या सविस्तर डेटाचे विश्लेषण करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे वाटप करावे. दररोज किती प्रकरणांवर कार्यवाही करायची, याचे स्पष्ट लक्ष्य निश्चित करून निर्धारित कालमर्यादेत प्रकरणे निकाली काढावीत. प्रलंबित तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एसआयआरच्या पहिल्या टप्प्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व शुद्ध करण्यास मदत झाली आहे, ही प्रक्रिया निवडणूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचेही चोक्कलिंगम यांनी नमूद केले. पुढील टप्प्यातील काम अधिक आव्हानात्मक असले तरी स्पष्ट नियोजन, उपलब्ध डेटाचे दैनंदिन विश्लेषण, कायदेशीर प्रक्रियेचे पालन आणि नागरिकांशी पारदर्शक संवाद यांच्या माध्यमातून ते यशस्वीपणे पूर्ण करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या कामकाजाची माहिती दिली. हाऊस-टू-हाऊस सर्व्हे, एन्यूमरेशन फॉर्मचे वितरण व संकलन, मतदार नोंदींचे मॅपिंग, डिजिटलायझेशन, अनमॅप्ड तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंद असलेले मतदार श्रेणीतील मतदारांची पडताळणी आणि पुढील टप्प्यातील नियोजनाबाबत जिल्हानिहाय सद्यस्थिती त्यांनी सादर केली. तसेच आगामी प्रारुप मतदार यादीचे प्रकाशन, हरकती व सुनावणी प्रक्रिया बाबत करण्यात आलेल्या तयारीची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.