सावंतवाडीत आजपासून रानभाज्या महोत्सव

सावंतवाडीत आजपासून रानभाज्या महोत्सव

 


सावंतवाडी 


       पावसाळ्यात निसर्गात उगवणाऱ्या औषधी आणि पौष्टिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, या हेतूने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.येत्या 25 आणि 26 ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली दिलीप भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या चविष्ट असण्यासोबतच औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना त्यांची ओळख नाही. हीच ओळख व्हावी म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले आहे.हा महोत्सव दोन्ही दिवस सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. यामध्ये रानभाज्यांसह विविध गावठी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.या महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन उद्या, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती सौ. दिपाली भालेकर यांनी केले आहे.