आडाळी ग्रामस्थांनी पुकारलेल्या लाँग मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा : अर्चना घारे-परब.
सावंतवाडी.
आडाळी येथील एमआयडीसीचे काम मार्गी लागावे. यासाठी स्थानिकांनी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर लॉंग मार्च २० तारखेला काढण्यात येणा-या लॉंग मार्च मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिली.
"स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी, त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी २०१३ मध्ये आडाळी येथे ७२० एकर क्षेत्रात MIDC मंजूर झाली. त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी आपल्या जमिनीचे महामंडळाकडे हस्तांतरण करून दिले.पण महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामूळे आजही येथील MIDC त उद्योग आलेले नाहीत. प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या ग्रामस्थांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अनेक उद्योजक आज आडाळीत उद्योग उभारणीसाठी इच्छुक आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळा मूळे आडाळी MIDC ला अनन्य साधारण महत्व आले आहे. येथे मंजूर असलेल्या सुमारे 200 कोटीच्या केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प (आयुष) ला जागा देऊन आज 3 वर्षे झाली तरी प्रकल्पाची पायाभरणी झाली नाही. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील किमान 5 हजार लोकांना रोजगार मिळेल एवढे उद्योग आज आडाळीत यायला तयार आहेत. मात्र लोकप्रतिनिधी आणि शासन यांना स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. म्हणून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कृती समितीतील या नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी व आपल्या भूमिपत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आपल्या सोबत आहे", अश्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी व्यक्त केल्या.
येत्या रविवारी ता. 20 ऑगस्ट रोजी आडाळी एमआयडीसी ते मुंबई - गोवा महामार्ग (बांदा सर्कल) या दरम्यान होणाऱ्या लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त तरुण-तरुणी, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.