सिंधुदुर्गात ५.४३ लाख पेट्रोल आणि ३.८० लाख लिटर डिझेलचा साठा....टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.....जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात सध्या ५ लाख ४३ हजार ५६६ लिटर पेट्रोल आणि ३ लाख ८० हजार ७६१ लिटर डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोल पंपांवर इंधनाची ही उपलब्धता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि काळजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.कुडाळ तालुक्यातील एकूण १४ पेट्रोल पंपांपैकी केवळ दोन पंपांवर इंधनाचा पुरवठा काही काळासाठी विस्कळीत झाला आहे. मात्र, उर्वरित १२ पंप पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. अडचण निर्माण झालेल्या दोन पंपांसाठी तेल कंपन्यांनी टँकर पाठवले असून उद्यापर्यंत तिथलाही पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यातील इंधन पुरवठा साखळी अखंडित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष काळजी घेत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या प्रमुख तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सातत्याने समन्वय साधला जात असून, मागणीनुसार पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. दरम्यान, इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा साठेबाजीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी तालुका पातळीवर विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके पेट्रोल पंपांची नियमित तपासणी करत असून, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपेक्षा जास्त इंधन साठवून ठेवू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे.
konkansamwad 
