फोंडाघाट येथे 'लक्ष्मीकांत गोशाळे'चे उद्घाटन.....देशी गायींच्या सान्निध्यातून कॅन्सरवर उपचाराचा नवा प्रयोग

फोंडाघाट येथे 'लक्ष्मीकांत गोशाळे'चे उद्घाटन.....देशी गायींच्या सान्निध्यातून कॅन्सरवर उपचाराचा नवा प्रयोग

 

फोंडाघाट

 

     देशी गोपालनातून सेंद्रिय शेती आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या उद्देशाने फोंडाघाट-पावणादेवी येथे 'लक्ष्मीकांत गोशाळे'चे उद्घाटन शनिवार, 25 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. दिवाकर विठ्ठल ठाकूर उर्फ राजा ठाकूर यांनी उभारलेल्या या गोशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक शशिकांत ठाकूर गुरुजी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रसन्ना देसाई यांनी देशी गाईची पूजा केली. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. राजा ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.या गोशाळेत राजा ठाकूर यांनी दोन देशी गाईंच्या मध्ये बेड ठेवून कॅन्सरग्रस्त व इतर आजारांच्या रुग्णांसाठी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. देशी गायींच्या सान्निध्यात राहिल्याने व झोपल्याने आजार पूर्णपणे नाहीसा होतो, असा दावा त्यांनी केला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अध्यक्षीय भाषणात प्रसन्ना देसाई यांनी कौतुक केले. "देशी गायीच्या पाठीवरून दिवसातून दोन वेळा हात फिरवला तर शुगर, ब्लड प्रेशर यासारखे आजार बरे होतात," असेही देसाई म्हणाले. या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व जनजागृती असल्याचे देसाई यांनी सांगितले. "एमटीडीसीचे डायरेक्टर यांची भेट घेऊन गोशाळेत दिली जाणारी थेरपीचे मार्केटिंग करून महाराष्ट्रातील पर्यटकांना याबद्दल माहिती दिली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले. जि.प. सदस्य राजन चिके म्हणाले, "सध्या रासायनिक खताचा बेसुमार वापर होत आहे. जगायचे असेल तर सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रत्येकाने एक तरी देशी गाय पाळावी." राजा ठाकूर यांना लागणारी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, प्रतिष्ठित ग्रामस्थ शशिकांत ठाकूर, आदर्श शेतकरी महेश संसारे, किसान मोर्चाचे उमेश सावंत, मारुती मिस्त्री, बांदल, सीमा परुळेकर, बाबू वाळवे, राजा पावस्कर, राजेंद्र मोरये, उदय ठाकूर, भाई तेली, सुवर्णा राणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात देशी गाईच्या शेण व गोमूत्रापासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते. समारोपाला राजा ठाकूर यांनी 'विषमुक्त शेती-सेंद्रिय शेती' असा नारा देत सर्वांचे आभार मानले.