जिल्ह्यातील बाजारपेठांत सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व शहरात कचराकुंड्या.....पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

जिल्ह्यातील बाजारपेठांत सीसीटीव्ही कॅमेरे, सर्व शहरात कचराकुंड्या.....पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

वैभववाडी


   जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये सुरक्षिततेसाठी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, तसेच कचरामुक्तीसाठी सर्व शहरांमध्ये कचराकुंड्यांची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी पालकमंत्री राणे यांची भेट घेतली. ओसरगाव टोलनाक्यावरून जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल महासंघाच्या वतीने पालकमंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली.या बैठकीत बोलताना नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, ओसरगाव टोलमधून सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना वगळण्याचा निर्णय कायम असून जिल्ह्याला कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून सर्व बाजारपेठांना कचराकुंड्या पुरवल्या जातील. तसेच व्यापारी महासंघाच्या कार्यालयासाठी लवकरच भूखंड उपलब्ध करून दिला जाईल. परप्रांतीय आणि फिरस्त्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महासंघातर्फे त्यांना ओळखपत्रे देण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केली. जिल्ह्यातील व्यापार आणि उद्योग वाढीसाठी दर तीन महिन्यांनी महासंघाच्या कार्यकारिणीसोबत आढावा बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.या भेटीप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष भोगले, अवधूत शिरसाट यांच्यासह कुडाळ, सावंतवाडी आणि इतर तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.