सावंतवाडीत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान 

सावंतवाडीत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान 

सावंतवाडी


    सावंतवाडी शहरात काल मध्यरात्री वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांचा कडकडाट सुरू होता. या वादळात मोती तलाव आणि शिव उद्यान परिसरातील झाडे कोसळली. तसेच मोती तलाव काठावरील अशोकाची झाडे उन्मळून पडली. विशेषतः रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचे मोठे छत वाऱ्यामुळे उडून थेट एस.पी.के. कॉलेजच्या परिसरात पडले. सुदैवाने हे छत मोती तलावाच्या समोरील गजबजलेल्या भागात कोसळले नाही. या नैसर्गिक संकटामुळे शहरातील वीज पुरवठा सुमारे दोन तास खंडित झाला होता. सुदैवाने या सर्व प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. शहरात इतरही काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.