ज्वेलरी कौशल्य प्रशिक्षणामुळे आंदुर्लेतील युवतींसाठी उद्योजकतेच्या नव्या वाटा

ज्वेलरी कौशल्य प्रशिक्षणामुळे आंदुर्लेतील युवतींसाठी उद्योजकतेच्या नव्या वाटा

 

कुडाळ

 

       महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आणि त्यांच्यातील असलेल्या  कौशल्याला सोनेरी पैलू पाडण्याचे काम कोकण संस्था गेली १४ वर्षे करत आहे. आंदुर्ले ग्रामपंचायत आणि कोकण एनजीओ इंडिया संस्थेच्या संयुक्त माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान  अंतर्गत ५ दिवसीय ज्वेलरी बनविणे प्रशिक्षणाचा समारोप सरपंच अक्षय तेंडोलकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करून करण्यात आला. या प्रशिक्षणात २४ युवतींनी सहभाग नोंदवून लाभ घेतला.
       दागिने बनविण्याचे कौशल्य आत्मसात केल्यामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होणार आहेत. कमी भांडवलात छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी महिलांना उपलब्ध होणार असून स्वतःच्या ब्रँडची निर्मिती, ऑनलाईन विक्री यांसारख्या अनेक पर्यायांमुळे त्यांचे आर्थिक सबलीकरण मजबूत होणार आहे. यामुळे गावातील महिला स्वावलंबनाकडे वाटचाल करतील असा विश्वास अनेक युवतींनी व्यक्त केला.
        या कोकण संस्थेच्या रोजगाराभिमुख उपक्रमामुळे स्थानिक स्तरावरच कौशल्याधारित उद्योग निर्माण झाल्याने गावातील आर्थिक चक्र मजबूत होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक नेतृत्व, आत्मविश्वास व सामुदायिक बांधिलकी देखील अधिक दृढ होईल असे सरपंच अक्षय तेंडोलकर यावेळी म्हणाले
      समारोप प्रसंगी उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये, सीआरपी अनुष्का राऊळ, रेखा वझरकर, प्रशिक्षक स्नेहल गावडे, संस्था समन्वयक समिर शिर्के यासह ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी युवतींना नव्या व्यवसायाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.