तुळस मध्ये आढळला दुर्मिळ निमविषारी 'बेंडोम कॅट स्नेक.'

तुळस मध्ये आढळला दुर्मिळ निमविषारी 'बेंडोम कॅट स्नेक.'

वेंगुर्ला.

   तुळस येथे आठ दिवसांपूर्वीच दुर्मिळ फॉर्स्टन कॅटस्नेक सापडल्यानंतर पुन्हा एकदा तुळस शिवाजी हायस्कूलच्या बाजूला प्रवीण कांदळकर यांच्या घरात दुर्मिळ जातीचा बेंडोम कॅटस्नेक आढळून आला. प्रवीण कांदळकर यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. सर्पमित्र महेश राऊळ यांनी येऊन तो साप सुरक्षित रित्या रेस्क्यू केला, आणि नंतर त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. 
   बेंडोम मांजऱ्या साप (Bedoms cat snake ) या सापाचा समावेश कोल्युब्रीडी सर्प कुळात होतो. मांजऱ्या सापामध्ये चार प्रजाती असून दुर्मिळ प्रजातीत त्यांचा समावेश केलेला आहे. यांच्या मांजरासारख्या डोळ्यांमुळे यांना मांजऱ्या असं नाव पडलं आहे. यांच्या डोक्यावर तपकिरी किंवा काळे लहान लहान ठिपके असतात. शरीर लांब सडपातळ व दोन्ही बाजूस चपटे असते. शरीरावर फिकट राखाडी ते पिवळसर तपकिरी रंगाच्या गडद तपकिरी किंवा काळी नागमोडी नक्षी असते. डोळ्याच्या मागून जबड्यापर्यंत काळी तिरकस रेष असते. त्यावर लहान लहान काळसर ठिपके असतात. मानेपेक्षा डोके बरेच मोठे असून इतर सापांच्या मानाने डोळे खूप मोठे असून ते मांजरासारखे दिसतात. डोळ्यातील बाहुली उभी असते. हा साप बहुतांश झाडावरच राहत असल्यामुळे याचे भक्ष पाली, सरडे, छोटे पक्षी त्यांची अंडी, पिल्ले, उंदीर हेच आहे. हा साप महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा तसेच ओरिसा मध्ये आढळून आलेला आहे. झाडेझुडपे जंगल गवताळ  खडकाळ प्रदेशात याचे वास्तव्य असते. गावात व शहरी भागातही तो सापडून आला आहे. हा साप चपळ असून तो सराईतपणे झाडावर वावरतो. एप्रिल मे महिन्यामध्ये याची मादी  झाडाच्या ढोलीत ५-७ अंडी घालते. हा साप निशाचर असल्यामुळे भक्ष्याच्या शोधार्थ तो रात्री बाहेर पडतो, यावेळी तो जास्त सतर्क असतो. हा साप निमविषारी असल्यामुळे माणसाला याचा धोका नसतो. याला डिवचले असता शरीराचे नागमोडी वेटोळे करून हल्ला करतो. आणि यावेळी तो शेपटीचा भाग वर उचलून जोरजोरात हलवतो आणि शत्रूला आपल्यापासून दूर राहण्याचे संकेत देतो.हा साप दुर्मिळ असल्यामुळे सहसा दिसत नाही.आणि बरेच वेळा मनुष्य वस्तीत आल्यामुळे त्याची हत्या केली जाते.पण अशा दुर्मिळ सापांना नष्ट होण्यापासून आपणच वाचवायला हवे. कोणताही साप घरात आल्यास जवळच्या सर्पमित्रांना बोलवून त्याचं रक्षण करा. असे आवाहन सर्पमित्र महेश राऊळ यांनी जनतेला केले आहे.