अणसूर-पाल हायस्कूल येथे गुरुकुल संगीत प्रशिक्षण वर्गाचे शानदार उद्घाटन
अणसूर
अणसूर पाल विकास मंडळ मुंबई व गुरुकुल संगीत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, अणसूर पाल हायस्कूल अणसूर येथे सुरू करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या भारतीय शास्त्रीय संगीत गायन-वादन शास्त्रोक्त मोफत प्रशिक्षण वर्गाचे शानदार उद्घाटन शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी, शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच सौ. कावेरी गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी शालेय समिती सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू गावडे, गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे संचालक आनंद माळकर व प्रशिक्षक संगीत विशारद हर्षल मेस्त्री, ग्रामस्थ नारायण गावडे, प्रभाकर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष गोविंद गावडे, संस्था सचिव लिलाधर गावडे व सर्व संस्था पदाधिकारी तसेच अणसूर पाल गावातील ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी कार्यरत असून सुरू झालेल्या या संगीत प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन, संगीत क्षेत्रात उत्तम सुयश मिळवावे असे आवाहन उद्घाटनप्रसंगी शालेय समिती चेअरमन मातोंडकर यांनी केले. तसेच अणसूर सरपंच सत्यविजय गावडे व पाल सरपंच सौ.कावेरी गावडे यांनी संगीत प्रशिक्षण वर्गासाठी शुभेच्छा देऊन, विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी संस्था व शाळेद्वारा राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून, शाळा व विद्यार्थी विकासासाठी आपले नेहमीच सर्वतोपरी सहकार्य असल्याचे सांगितले.
गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे संचालक आनंद माळकर यांनी संगीत हे मोबाईल स्क्रीनिंगच्या वाढत्या धोक्यापासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी पोषक असून, विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणातून संगीत क्षेत्रात आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले.गुरूकुल संगीत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षणार्थी जिल्हा व राज्य स्तरावरील विविध संगीत स्पर्धात आपले नाव कमावीत आहेत .आज सुरू झालेल्या या संगीत प्रशिक्षण वर्गात शाळेतील विद्यार्थ्यांना, गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक संगीत विशारद हर्षल मेस्त्री हे प्रशिक्षण देणार असून या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात उत्तम सुयश मिळवतील अशी संस्थेच्यावतीने ग्वाही दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून, सुरू करण्यात आलेल्या या संगीत प्रशिक्षणाची सुरूवात दिपप्रज्वलन, इशस्तवनाने करण्यात आली.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला शालेय शिक्षिका अक्षता पेडणेकर, चारुता परब, संचिता परब यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मान्यवरांचे स्वागत शालेय मुख्यमंत्री श्रीयश मालवणकर, विद्यार्थीनी प्रतिनिधी खुशी मालवणकर व शालेय सांस्कृतिक मंत्री संतोष नाईक यांनी केले. संगीत प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश घाटवळ, सुत्रसंचलन विजय ठाकर व आभार चारुता परब यांनी मानले.

konkansamwad 
