माडखोल येथे टेम्पोच्या धडकेत दाणोलीतील युवक जखमी

माडखोल येथे टेम्पोच्या धडकेत दाणोलीतील युवक जखमी

 

सावंतवाडी

 

      माडखोल येथे  टेम्पो आणि इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात दाणोली येथील एक दुचाकीस्वार युवक जखमी झाला असून, त्याला तातडीने अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित युवक आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून दाणोली येथून सावंतवाडीच्या दिशेने येत होता. माडखोल परिसरात पोहोचले असता, मागून आलेल्या एका टेम्पोने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार युवक रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या अपघातात त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि जखमी युवकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी युवक दाणोली परिसरातील असल्याचे समजते. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सावंतवाडी-गोवा मार्गावर वाहतुकीची कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माडखोल परिसरात लागोपाठ दोन अपघात झाल्याने स्थानिक नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, वाहनचालकांनी या परिसरातून वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.