खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांचे कौतुक....राजकीय चर्चांना उधाण

खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांचे कौतुक....राजकीय चर्चांना उधाण

मुंबई

 

     एका राजकीय घडामोडीत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक मंत्री नितेश राणे यांची "उत्तम मंत्री" म्हणत पहिल्यांदाच जाहीरपणे स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राणे यांनी राऊत यांना चिडवण्यासाठी चक्क 'बरनॉल' औषध पार्सल म्हणून पाठवले होते. यावरून प्रसारमाध्यमांनी राऊत यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे संतापण्याऐवजी अत्यंत शांतपणे आणि अनपेक्षित उत्तर दिले. नितेश राणेंनी पाठवलेल्या या गिफ्टवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी त्यांना कोणतेही रिटर्न गिफ्ट पाठवणार नाही, उलट त्यांनी दिलेल्या गिफ्टचा मी स्वीकार करेन. हे औषध मी गरजू रुग्णांना पाठवून देईन. पण राणेंनी स्वतःकडे बरनॉल का ठेवले होते? ते कुठे जखमी झाले होते का? असा मिश्कील चिमटाही त्यांनी यावेळी काढला. या वादात पुढे बोलताना संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. नितेश राणे हे तरुण मंत्री असून त्यांचे कुटुंब मूळचे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. सत्ता कधीही अमर नसते, ती येत-जात राहते, त्यामुळे आपल्या खात्याकडे नीट लक्ष द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला. राज्यात जे काही मंत्री खरोखर उत्तम काम करत आहेत, त्यापैकी नितेश राणे हे एक आहेत, अशी स्पष्ट कबुली राऊत यांनी दिली. नितेश राणे यांच्याकडे असलेले मत्स्य विभाग हे अत्यंत महत्त्वाचे खाते आहे आणि ते या खात्याचा कारभार उत्तम रितीने सांभाळत असून त्यांनी चांगल्या योजना आणल्या आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकाचे कौतुक केले. नेहमी एकमेकांवर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये अचानक घडलेल्या या संवादामुळे सध्या राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.