मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करा......मनसे नेते शिरीष सावंत यांचे आवाहन
सावंतवाडी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी होणारा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा, असे आवाहन मनसे नेते तथा जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत यांनी केले आहे. सावंतवाडी येथे आयोजित मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.मनसेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही आढावा बैठक सावंतवाडीत पार पडली.याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिरीष सावंत यांनी पक्षवाढी संदर्भात महत्वपूर्ण रणनीतीवर चर्चा केली. ते म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वत्र पैशाचे राजकारण जोर धरत असतानाही, मनसेला मानणारा मोठा वर्ग आजही पक्षासोबत ठामपणे उभा आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी कोणत्याही मोहाला बळी न पडता आपल्या पद्धतीने निष्ठापूर्वक काम करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.सध्याच्या सत्ताधारी पक्षांच्या कारभारावर सर्वसामान्य जनता प्रचंड नाराज झाली असून त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. देशातील आणि राज्यातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, महागाईच्या वरवंट्याखाली जनता भरडली जात असल्याचे स्पष्ट करत शिरीष सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली. म्हणूनच, यंदाचा वाढदिवस हा जनतेला दिलासा देणाऱ्या विविध सामाजिक आणि जनोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.या महत्वपूर्ण बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, धीरज परब, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गणेश वाईरकर, राजू कासकर, सुनील आसवेकर, काशीराम गावडे, चिन्मय नाडकर्णी, विष्णू वसकर, केतन सावंत, राज सावंत, संतोष शेळके, समीर म्हापणकर, सूरज राऊळ, गुरुदास गवंडे, श्रीराम सावंत यांसह मतदारसंघातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
