मान्सूनच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज
सावंतवाडी
कोकण रेल्वेने आगामी मान्सून हंगामातील मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने संपूर्ण मार्गावर व्यापक मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असून १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे.या कालावधीत रेल्वे मार्गावरील सुरक्षेसाठी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी जलनिस्सारण व्यवस्था मजबूत केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मार्गावर ६५७ प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास गस्त घालणार असून संवेदनशील ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री आणि आपत्कालीन वैद्यकीय वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.पावसाळ्यात रेल्वेचा वेग मर्यादित ठेवण्याचे निर्देश लोको पायलटांना देण्यात आले असून, महत्त्वाच्या नद्यांवर पूर सूचना प्रणाली आणि पुलांवर वाऱ्याचा वेग मोजणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील. प्रवाशांना रेल्वेच्या अद्ययावत माहितीसाठी १३९ हा हेल्पलाईन क्रमांक आणि कोकण रेल्वेचे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
konkansamwad 
