वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा

वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा

 

कणकवली

 

        कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना पडलेला एक मोबाईल मिळाला. त्यानंतर त्यांनी त्या मोबाईल मालकाचा शोध घेऊन मोबाईल मंगेश महादेव लाड रा. नाटळ यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी मंगेश लाड यांनी विनोद चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. मंगेश लाड हे कणकवली बाजारात आले असता त्यांचा मोबाईल पटवर्धन चौक येथे पडला होता. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. त्यावेळी हा मोबाईल तेथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांना मिळाला. त्यांनी त्या मोबाईल मधील सिम कार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये घालून मोबाईल मालकाच्या नातेवाईकांना कॉल केला. त्यावेळी हा मोबाईल मंगेश लाड यांचा असल्याचे समजले. त्यानंतर मंगेश लाड हे कणकवली पटवर्धन चौक येथे आले व मोबाईल ताब्यात घेतला. विनोद चव्हाण यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.