नागरिकांच्या तक्रार निवारणीसाठी कुडाळ तहसील कार्यालयात सूचनापेटी कार्यान्वित

कुडाळ
नागरिकांकडून प्रशासनाबाबत काही सूचना किंवा तक्रारी असतात. त्या तक्रारी आणि सूचना थेट तहसीलदारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी तहसील कार्यालयात सूचना पेटी कार्यान्वित केली आहे. नागरिकांनी त्यांच्या सूचना किंवा तक्रारी असतील तर ते या पेटित टाकाव्यात असे आवाहन श्री. वसावे यांनी केले आहे. बऱ्याच वेळा तहसीलदार विविध प्रशासकीय कामानिमित्ताने कार्यालयात नसतात किंवा कार्यालयात असले तरी विविध केसेस सुरु असल्याने सामान्य नागरिकांना तहसीलदारांची भेट घेता येत नाही. त्यासाठी कुडाळच्या तहसीलदारांनी या सूचना पेटीचा उपक्रम सुरु केला आहे. तहसीलदार दालनाच्या बाहेरच हि सूचना पेटी बसविण्यात आली असून या सूचना पेटीची चावी तहसीलदारांजवळच राहणार आहे. ज्यावेळी या पेटित पडलेली तक्रार किंवा सूचना दिसेल त्यावेळी हि पेटी उघडून तहसीलदार तात्काळ त्याची दखल घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना, तक्रारी असतील तर या पेटीत टाकाव्यात असे आवाहन श्री. वसावे यांनी केले आहे. यावेळी महसूल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.