भजनी बुवांवरील सहा महिन्यांची बंदी रद्द करण्याची मागणी......अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर तिठा येथे झालेल्या डबलबारी भजन सामन्यांमध्ये दिनेश वागदेकर, उदय पारकर व दीपक नानचे या तीन भजनी बुवांवर लादण्यात आलेली सहा महिन्यांची बंदी अनधिकृत व अन्यायकारक असल्यास ती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करणारे निवेदन राजाराम खोर्जुवेकर यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर केले आहे. तसेच संबंधित भजनी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकारिणीच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्यामार्फत या तीन बुवांवर सहा महिन्यांसाठी डबलबारी भजन सामन्यांमध्ये बंदी घालण्यात आल्याचे प्रसारमाध्यम, आयोजक व भजनी क्षेत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर कारवाईमुळे केवळ तीन बुवांचेच नव्हे, तर त्यांच्या डबलबारीमध्ये संगीत साथ करणाऱ्या अनेक कलाकारांचेही आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. बंदी घालण्याचा कायदेशीर अधिकार कोणता? बंदीपूर्वी आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती का? वाद मिटलेला असतानाही बंदी का घालण्यात आली? सामन्यावेळी भजनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका काय होती? पूर्वीच्या घटनांमध्ये समान कारवाई का करण्यात आली नाही? अखिल भारतीय मुंबई संस्थेचा हस्तक्षेप व इतर जिल्ह्यांतील बंदी यामागील कारणे काय आहेत? आणि ही बंदी वैयक्तिक वादातून घेण्यात आली आहे का? अशा गंभीर बाबींची चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे खोर्जुवेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. डबलबारी भजन हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून अनेक कलाकारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या कारवाईचा परिणाम अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बंदीचा कायदेशीर आधार तपासून तोपर्यंत बंदीला स्थगिती द्यावी, बंदीचा अधिकृत ठराव, संस्थेची नियमावली व कारवाईचे कारण यांची कागदपत्रे मागवून तपासावीत, भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग व अखिल भारतीय मुंबई संस्थेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी, बंदी अनधिकृत, अधिकाराबाहेरची अथवा पक्षपाती असल्याचे निष्पन्न झाल्यास ती तात्काळ रद्द करण्याचे निर्देश द्यावेत, भविष्यात कोणत्याही भजनी कलाकारावर कारवाई करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून लेखी नोटीस, खुलासा आणि निष्पक्ष सुनावणीची संधी द्यावी, अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. भजन ही आपली सांस्कृतिक परंपरा असून या परंपरेचे रक्षण करण्यासाठी शिस्त आणि नियम आवश्यक आहेत, परंतु त्या नियमांचा वापर कोणत्याही कलाकाराचे आर्थिक, मानसिक व सामाजिक नुकसान करण्यासाठी होता कामा नये, असे मत खोर्जुवेकर यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात तातडीने न्याय मिळावा व संबंधित तीनही बुवांवरील अन्यायकारक बंदी हटविण्यात यावी, या मागणीसाठी मी दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनाद्वारे त्यांनी जाहीर केले आहे.
konkansamwad 
