डबलबारी बुवांवरील बंदी तात्काळ हटवा, अन्यथा आमरण उपोषण.....प्रसाद करलकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

डबलबारी बुवांवरील बंदी तात्काळ हटवा, अन्यथा आमरण उपोषण.....प्रसाद करलकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

सिंधुदुर्ग 


   डबलबारी आमने-सामने सामन्यांदरम्यान दिनेश वागदेकर, उदय पारकर, दीपक नानचे या तीनही डबलबारी भजनी बुवांवर भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांनी सहा महिन्यांसाठी घातलेली बंदी अनधिकृत असून ती तात्काळ हटवण्यात यावी, अशी मागणी प्रसाद विजय करलकर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या बंदीमुळे केवळ तीन बुवांवरच नव्हे तर त्यांच्यासोबत डबलबारीमध्ये साथ करणाऱ्या तिन्ही मंडळातील संगीत कलाकारांवरही उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे. भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांनी अधिकृत बंदीबद्दल आवक जावक पत्र व्यवहार सादर करावा, तसेच कोणत्या कायदेशीर घटनात्मक तरतुदीद्वारे ही कारवाई केली? सदरील तीनही बुवा त्या भजनी संस्थेचे सभासद नसताना देखील कारवाई कशी केली? याचा खुलासा भजनी संस्थेने द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील बंदीबाबत अधिकृत शासन निर्णय काय व कधीपासून झाला? आणि त्याच वेळी ती लागू करण्याबाबत मंडळाने खुलासा करावा, तसेच भूतकाळात डबलबारी भजनी सामन्यांदरम्यान अशोभनीय सादरीकरण झालेल्या सर्व बुवांविरोधात भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांनी कारवाई का केली नाही, याबाबत मार्गदर्शन द्यावे, अशी मागणीही निवेदनात आहे. सदरील डबलबारी बुवांविरोधात लादलेली बंदी अनधिकृत आढळल्यास भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तीनही बुवांचे आर्थिक व मानसिक शोषणास ते पूर्णपणे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मी स्वतः भजन प्रेमी असून तीनही बुवांवर लादली गेलेली अनाधिकृत बंदी विरोधात वाचा फोडण्यासाठी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यासमोर ठीक सकाळी ९.४५ वाजता आमरण उपोषणास बसणार असल्याचे प्रसाद करलकर यांनी जाहीर केले आहे.