खासगी कर्मचाऱ्यांना दोन, तर सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवसांची सुट्टी!....सरकारच्या मोठ्या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
युनाइटेड अरब अमिरात (UAE) मधील कर्मचाऱ्यांसाठी तेथील सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी जाहीर केली आहे. देशाचा ५५ वा 'युनियन डे' अर्थात 'ईद अल एतिहाद २०२६' च्या निमित्ताने सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २ आणि ३ डिसेंबर रोजी दोन दिवसांची पेड सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी (२ डिसेंबर) आणि शुक्रवारी (३ डिसेंबर) असणाऱ्या या सुट्ट्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जाणार नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला आणि कर्मचाऱ्याला या राष्ट्रीय उत्सवात उत्साहाने सहभागी होता यावे, या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यूएईच्या मानव संसाधन आणि व्यवस्थापन मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) द्वारे अधिकृत माहिती देत ही सुट्टी देशातील सर्वच खासगी आस्थापनांना लागू असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर सुट्ट्यांची मोठी पर्वणीच चालून आली आहे. सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवसांची सुट्टी मंजूर केली आहे. या सुट्ट्यांना जोडूनच पुढे विकेंड येत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार असून, आता थेट ७ डिसेंबर रोजीच सरकारी कार्यालये पुन्हा सुरू होतील. सरकारच्या या घोषणेमुळे सर्वच स्तरातील नोकरदार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असले, तरी या सलग सुट्ट्यांमुळे देशातील दैनंदिन कामकाज काही दिवस पूर्णपणे ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
konkansamwad 
