राज्यात आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा; सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी.
पुणे.
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट आणि रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. पावसाच्या आगमनामुळे राज्यातील तापमानात काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार आणि रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. तर, उर्वरित राज्यांत वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.
भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाणेसाठी ११ जूनपर्यंत विजांचा कडकडाट, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाचा अंदाज देत यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि कल्याणच्या काही भागांतील रहिवासी मोसमातील पहिल्या मान्सूनपूर्व पावसाने जागे झाले आणि त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला. शहर आणि ठाणे जिल्ह्यात 10 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका/मध्यम ते मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.