हीन प्रवृत्तीने श्रीधर नाईक यांची हत्या केली : ब्रिगे.सुधीर सावंत कणकवली येथे कै. श्रीधरराव नाईक यांचा ३३ वा स्मृतीदिन साजरा.

हीन प्रवृत्तीने श्रीधर नाईक यांची हत्या केली : ब्रिगे.सुधीर सावंत  कणकवली येथे कै. श्रीधरराव नाईक यांचा ३३ वा स्मृतीदिन साजरा.

कणकवली.

   श्रीधर नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते. हीन प्रवृत्तीने त्यांची हत्या केली. याच हीन प्रवृत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण बिघडविले. मारामारी खून हा राजकारणाचा विषय नाही राजकारणात हे घडत असेल तर त्याला ठेचून काढले पाहिजे. केवळ वैभव नाईक, सुशांत नाईक यांचा हा लढा नाही. हा लढा आम्हा सर्वांचा आहे. सीमेवर मी दहशतवादा विरुद्ध  लढत होतो. मात्र राजकारणात आलो तेव्हा श्रीधर नाईक यांनी माझ्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली. राजकारणातही दहशतवादा विरुद्ध संघर्ष करावा लागला.आजही तो संघर्ष सुरू आहे.सर्वानी आपली तत्वे जोपसली पाहिजेत त्यासाठी लढलं पाहिजे.त्याग केला पाहिजे.असे प्रतिपादन माजी खा. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले.
   कै.श्रीधरराव नाईक यांचा ३३ वा स्मृतीदिन शनिवार २२ जून २०२४  रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा प्रथमतः शुभारंभ करण्यात आला.यावेळी ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी शब्दसुमनांनी  श्रद्धांजली वाहिली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच  जेष्ठ नागरिक व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.
   यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, श्रीधर नाईक हे व्यक्ती म्हणून जिवंत नसले तरी त्यांचे विचार ३३ वर्षे होऊनही जिवंत आहेत. त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेले त्यांचे जेष्ठ सहकारी यांच्या उपस्थिती वरून हे दिसून येते. श्रीधर नाईक याचे समाज कार्य पुढे नेण्याचे काम वैभव नाईक,सुशांत नाईक, संकेत नाईक करीत आहेत. त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं कि नाईक कुटुंबाकडे बघितले जाते. श्रीधर नाईक यांना अभिप्रेत असलेले काम नाईक कुटुंबीय करत आहेत.
   आमदार वैभव नाईक म्हणाले,२२ जून हा दिवस आयुष्यात येऊच नये असे आम्हाला वाटते. श्रीधर नाईक यांचे कार्य युवापिढीला समजावे, युवा पिढीने श्रीधर नाईक यांचे विचार आत्मासात करून समाजकार्यात पुढे यावे त्यासाठी स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रीधर नाईक हे रंजल्या गांजलेल्यांना मदत करत होते.त्यांची लोकप्रियता वाढत चालली होती. त्यांचे हे यश पचत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली. श्रीधर नाईक चुकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करत. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही निष्ठेने जिल्हावासियांची सेवा करत राहू असे आश्वासित केले.
    शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृति चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी वैभव नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक हे मेहनत घेत आहेत. जिल्ह्याच्या जडणघडणीत नाईक कुटूंबांचे मोठे योगदान आहे.राजकारणातील अडथळा दूर करण्यासाठी श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली.सध्या राजकारणात सत्तेसाठी पैसे आणि पैशासाठी सत्ता हेच समीकरण चालू आहे. न्याय, मते आणि नेते देखील पैशाने विकत घेतले जात आहेत.जनतेने अशा प्रवृत्ती विरोधात लढले पाहिजे.एक दिवस नक्कीच श्रीधर नाईक यांच्या विचारांचा विजय होईल.
    काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, श्रीधर नाईक असते तर आज जी काँग्रेसची परिस्थिती जिल्ह्यात आहे त्यापेक्षा चांगली असती.त्यांच्याकडून आम्ही अनेक प्रबोधनाच्या गोष्टी शिकलो. त्यांचे विचार शिकवण यामुळेच आज मी जिल्हाध्यक्ष झालो आहे असे त्यांनी सांगितले.
    राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले,३३ वर्षे उलटली तरी देखील श्रीधर नाईक यांच्या आठवणी अनेकांच्या हृदयात तेवत आहेत. श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर नाईक कुटुंबीयाने  हतबल न होता दृष्ट प्रवृत्ती विरोधात लढा दिल्याचे  सांगितले.
    प्रास्ताविकपर भाषणात सुशांत नाईक म्हणाले ३३ वर्षे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सामाजिक कार्य करत असताना १० हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. चित्रकला, निबंध, मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. महिला बचत गट, जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात येतो. दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते यापुढेही अशाच सामाजिक कार्याचा वारसा जोपासला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
   यावेळी आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत -पालव, संदीप सरवणकर यांनीही आपले विचार व्यक्त करून श्रीधर नाईक यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
    याप्रसंगी जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, अनंत पिळणकर,सुगंधा साटम, रामू विखाळे, बाळा भिसे, मुरलीधर नाईक,राजू शेटये, कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर,प्रसाद अंधारी, प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरुणकर, अशोक करंबेळकर, अरुण भोगले, अजू मोर्ये,आबा दुखंडे,डॉ. रावराणे, अबूशेट पटेल, भास्कर राणे,व्ही.के.सावंत,भाऊ परब, अण्णा महाडिक,आबू पटेल, प्रकाश जैतापकर, विजय पारकर, राजू राठोड, राजू राणे, महेश कोदे, रुपेश आमडोस्कर, प्रा.मंदार सावंत, संजय पारकर, सचिन आचरेकर, श्री.पांढरे, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, संजना कोलते,दिव्या साळगावकर, प्रतीक्षा साटम, मीनल म्हसकर आदींसह श्रीधर नाईक प्रेमी, विद्यार्थी व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले तर आभार प्रदर्शन संकेत नाईक यांनी केले.