सामाजिक कामात ‘इंटरेस्ट’ आत्ताच विधानसभेवर चर्चा नको : विशाल परब.
सावंतवाडी.
भाजपाच्या माध्यमातून मला समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करायचे आहे. त्यात मला "इंटरेस्ट" आहे. त्यामुळे आत्ताच विधानसभेवर चर्चा नको, अशी भूमिका भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली. दरम्यान मी २००९ पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात काम करत आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्थानिक- बाहेरचे हा विषय माझ्या दृष्टीने दुय्यम आहे. संजू परब हे माझे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणार नाही, असे त्यांनी सांगितले
श्री.परब यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सुधीर आडिवरेकर, दीलीप भालेकर, अमित गंवडळकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. परब म्हणाले, निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून आज आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भविष्यात त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदवीधर तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ते लवकरच सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी दौऱ्यात यावे यासाठी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा दौरा या ठिकाणी यशस्वी केला जाईल. त्यांच्यासारखे युवा नेतृत्व पुन्हा निवडून आल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील तरुणांना व पदवीधरांना होणार आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप नेत्यांचे श्री. परब यांनी आभार मानले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विजयाची "हॅट्रिक" झाली असे ते म्हणाले. यावेळी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.