येत्या १ जुन पासून ड्रायव्हिंग लायसेन्स च्या नियमात मोठे बदल.

मुंबई.
ड्रायव्हिंग लायसन्स (वाहनचालक परवाना) मिळविणे हे सोपे काम नाही. या परवान्यासाठी (Driving License) लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रियांतून जावे लागते.चाचणीसाठी आरटीओ मध्ये तासन् तास लांब रांगेत उभे राहावे लागते. पण, आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला चाचणी देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही. त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम १ जून २०२४ पासून लागू होतील.नवीन नियमांनुसार स्थळानुरूप ठरवून दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये एवढा दंड असेल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना पकडली गेल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच वाहनमालकाचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल आणि वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना परवाना मिळू शकणार नाही.
रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन चालक परवान्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांमध्येही बदल केले आहेत. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांच्या परवान्यांमध्येही गरजेनुसार बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.
खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांसाठी नवीन नियम-
खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे अतिरिक्त दोन एकर जमीन आवश्यक आहे.वाहनचालकाच्या चाचणीसाठी आवश्यक त्या सुविधा खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षकांसाठी पात्रता-
प्रशिक्षकांकडे किमान हायस्कूल डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित मूलभूत गोष्टी परिचित असल्या पाहिजेत.
प्रशिक्षणाचा कालावधी-
कमीत कमी २९ तासांच्या प्रशिक्षणासह हलके वाहन प्रशिक्षण चार आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले जाणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण लेखी आणि प्रात्यक्षिक अशा किमान दोन विभागांमध्ये दिले गेले पाहिजे.
जड मोटार वाहन प्रशिक्षण-
जड मोटार वाहनांसाठी आठ तासांचे लेखी शिक्षण आणि ३१ तासांची प्रात्यक्षिक तयारी, असे एकूण ३८ तासांचे प्रशिक्षण असेल. हे प्रशिक्षण सहा आठवड्यांच्या आत पूर्ण व्हायला हवे. खासगी वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांकडून हलक्या आणि जड वाहनांसाठी इच्छुक वाहनचालकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जावे हा या नियमांमागचा उद्देश आहे.
विविध प्रकारच्या वाहनचालक परवान्यासाठी शुल्क रचना खालीलप्रमाणे-
१. शिकाऊ परवाना- रु. २००
२. शिकाऊ परवाना नूतनीकरण- रु. २००
३. आंतरराष्ट्रीय परवाना- रु. १०००
४. कायमस्वरूपी परवाना- रु. २००