तांबळडेग येथे ग्रा.पं.सदस्याकडून महिला ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ व मारण्याची धमकी; ग्रा.पं.सदस्या विरोधात गुन्हा दाखल.

देवगड.
ग्रामपंचायत सभेतील बाचाबाची नंतर महिला ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रमाणे महिला ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेल्या तक्रारी वरून तांबळडेग ग्रामपंचायत सदस्य सहदेव काशिनाथ कोचरेकर (४८) राहणार तांबळडेग यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतचे शुक्रवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचरेकर यांची महिला ग्रामपंचायत सदस्यांबरोबर बाचाबाची झाली. सभा संपल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडताना ग्रामपंचायत आवारात सदस्य सहदेव कोचरेकर यांनी बाचाबाची झालेल्या महिला ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली. तसेच मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. याबाबत त्या महिला सदस्यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेला तक्रारीनुसार पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचेकर यांच्या विरुद्ध भादवी ३५४, ३५४बी ,३५२,३२३,५०४,५०६,अन्वये गुन्हे दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वनिता पडवळ करीत आहेत.