वेंगुर्ला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्‍तीची कारवाई सुरू.

वेंगुर्ला नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्‍तीची कारवाई सुरू.

वेंगुर्ला.

  वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या कर विभागाकडून मालमत्‍ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्‍यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत ८ मालमत्ता सील करण्‍यात आलेल्‍या आहेत. वेंगुर्ला शहरात निवासी, बिगर निवासी, मिश्र व औदयोगिक अशा एकूण ६५५३ नोंदणीकृत मालमत्‍ता आहेत. वेंगुर्ला नगरपरिषदेकडून वारंवार आवाहन करुन ही कर न भरणा-या थकबाकीदारांच्‍या मालमत्‍ता सील करण्‍याची मोहीम हाती घेण्‍यात आलेली आहे.
   १ मार्च पासून पुढील कालावधीत ज्‍या मालमत्‍ताधारकांचा मालमत्‍ता कर थकीत आहे अशा मालमत्‍ता ३१ मार्चपर्यंत सील करण्‍यात येणार असून शहरातील मालमत्‍ताधारकांना मागणी बिले यापूर्वीच वाटप केलेली असल्‍याने कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले आहे. त्‍याचप्रमाणे वेंगुर्ला नगरपरिषदेच्‍या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपट्टी न भरणा-यांची नळ कनेक्‍शन तोडण्‍यात आलेली आहेत.
   वेंगुर्ला शहरातील नागरीकांच्‍या सोयीसाठी या मोहीमेअंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेचे नागरी सुविधा केंद्र ३१ मार्च २०२४ पर्यंत कार्यालयीन सुट्टीच्‍या कालावधीत कर भरणा करण्‍याकरीता सुरु ठेवण्‍यात येणार असून वेंगुर्ला शहरातील थकीत पाणीपट्टी तात्‍काळ भरणा करुन नळतोडणीची कारवाई टाळावी तसेच थकीत मालमत्‍ता कर भरणा करुन मालमत्‍ता जप्‍तीची कारवाई टाळावी असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.