मळगाव ब्राह्मणआळीत रानगव्यांचा धुमाकूळ......शेतकऱ्यांची भातशेती उद्ध्वस्त....हवालदिल शेतकऱ्यांचा वन विभागाला आंदोलनाचा इशारा
मळगाव
मळगाव ब्राह्मणआळी परिसरामध्ये रानगव्यांनी उच्छाद मांडून शेतकऱ्यांची मोठ्या कष्टाने केलेली भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. ऐन पिकाच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मणआळी भागात रानगव्यांच्या उपद्रवात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी हे रानगवे थेट शेतात उतरून तयार पिके तुडवून नष्ट करत आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, दिवसरात्र मेहनत घेऊन जोपासलेले भातपीक अवघ्या काही दिवसांत भुईसपाट झाले आहे.या भागातील निलेश राऊळ, अनिल राऊळ, रामकृष्ण परब, विष्णू परब, विश्वनाथ राऊळ, महादेव राऊळ, गुरुनाथ राऊळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे.वन विभागाने त्वरित घटनास्थळी येऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शेतीच्या रक्षणासाठी ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
konkansamwad 
