झारापमध्ये २९ मार्चला भव्य मोफत आयुर्वेद आरोग्य शिबिर
कुडाळ
तालुक्यातील झाराप येथे मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, श्री देवी भावई सेवाभावी संस्था आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने एका मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २९ मार्चला सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत झाराप येथील केंद्र शाळा नंबर १ (श्री देवी भावई मंदिराजवळ) येथे पार पडणार आहे.ग्रामीण भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि उपचाराची संधी या माध्यमातून मिळणार आहे.या शिबिरामध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, अॅलर्जी आणि त्वचारोगांपासून ते पचनसंस्थेच्या समस्यांपर्यंत अनेक आजारांवर मार्गदर्शन केले जाईल. तसेच हाडे व सांध्यांचे आजार, पक्षाघात (पॅरालिसिस), वातविकार, मूळव्याध, भगंदर यांसारख्या गंभीर व्याधींवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. लहान मुलांचे आजार आणि स्त्रीरोगांवर देखील यावेळी विशेष लक्ष दिले जाईल. जुनाट आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.केवळ तपासणीच नाही, तर रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घ्यावा, योगासने कशी करावीत आणि निरोगी जीवनशैली कशी जगावी, याचे सविस्तर मार्गदर्शनही आयोजकांतर्फे केले जाणार आहे. या सामाजिक उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी ९४२०९०६६९२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
konkansamwad 
