ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात वेंगुर्ल्यातील ४४ मेडिकल स्टोअर्स बंद....देशव्यापी आंदोलनाला केमिस्ट असोसिएशनचा पाठिंबा

ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात वेंगुर्ल्यातील ४४ मेडिकल स्टोअर्स बंद....देशव्यापी आंदोलनाला केमिस्ट असोसिएशनचा पाठिंबा

 

 वेंगुर्ला

   

 वेंगुर्ले


     ऑनलाईन औषधांच्या विक्रीमुळे रुग्णांच्या आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्याविरोधात बुधवार दि. २० मे रोजी सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या देशव्यापी आंदोलनाला वेंगुर्ला तालुक्यातील मेडिकल व्यावसायिकांनी आपापली मेडिकल स्टोअर्स बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.वेंगुर्ला तालुक्यातील किरकोळ व घाऊक असे एकूण 44 मेडिकल व्यावसायिकांनी शहरासह अन्य भागातील दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी वेंगुर्ला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार विभा खानोलकर, सचिव संदीप कडव, रोहित नाईक, आशिष पाडगावकर, सचिन भानुशाली, प्रशांत नेरुरकर, मानसी परब, मकरंद देसाई, निलम गावडे, विठ्ठल गोवेकर, रणजित पाटील तसेच अन्य मेडिकल स्टोअर्स व्यावसायिक उपस्थित होते.येणाऱ्या काळात ऑनलाईन औषधांच्या विक्रीमुळे रुग्णांना व सामाजिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होणार आहे. ऑनलाईन औषधे विक्री व साठ्याबाबत माहिती मिळत नसल्याने हे धोकादायक ठरणार आहे, असे असोसिएशनचे तालुकाध्यक्ष ओंकार खानोलकर यांनी सांगितले.  

 

प्रमुख आक्षेप

1.  बोगस व निकृष्ट औषधांचा धोका: ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर औषधांच्या गुणवत्तेची हमी नाही.  
2.  नशेच्या औषधांचा गैरवापर: तरुण पिढीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची सहज उपलब्धता.  
3.  गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहज उपलब्धता आरोग्यासाठी धोकादायक.  
4.  साठवणूक नियमांचे उल्लंघन:औषधांच्या तापमान व साठवणुकीकडे दुर्लक्ष.  

 

       या सर्व धोक्यांना आळा बसावा यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून संपूर्ण वेंगुर्ला तालुक्याचा पाठिंबा मिळाला आहे, असे खानोलकर म्हणाले.