कुडाळात ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रॅली....पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे सहभागी
कुडाळ
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.राष्ट्रप्रेमी नागरिक मंच यांच्या वतीने आयोजित ही रॅली श्री भैरव मंदिरापासून सुरू झाली. रॅलीच्या अग्रभागी देशभक्तीपर गीत वाजवणारे वाहन होते. त्यामागे विविध शाळांतील विद्यार्थी आणि नागरिक हातात तिरंगे घेऊन आणि गळ्यात तिरंगा स्कार्फ परिधान करून सहभागी झाले होते. बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळेश्वरवाडी, पडतेवाडी शाळा, कुडाळ हायस्कूल, पणदूर हायस्कूल, जीवन शिक्षण मंदिर या शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदेवता, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, झाशीची राणी यांची वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांचे ढोलपथक आणि विद्यार्थिनींचे लेझीम पथक हे रॅलीचे आकर्षण ठरले.रॅलीच्या मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भैरव मंदिर, मुख्य रस्ता, पोलीस ठाणे, कॉलेज रोड मार्गे ही रॅली एस. एन. देसाई चौकात पोहोचून तेथे छोटेखानी सभेने संपन्न झाली.या रॅलीत पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी सहभाग घेतला. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान आणि त्याग केला आहे. मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. वर्षाचे 365 दिवस देशाचा विचार केला पाहिजे, असे आमदार निलेश राणे म्हणाले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून देश मोठा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विवेक पंडित यांनी केले. प्रभाकर सावंत यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, विविध लोकप्रतिनिधी, नगरसेवक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
