सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात २८ अत्याधुनिक वाहने दाखल...पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण.

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात २८ अत्याधुनिक वाहने दाखल...पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण.

 

सिंधुदुर्गनगरी

 

   जिल्ह्याची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून खरेदी करण्यात आलेल्या २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथील नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित वाटावे, ही शासनाची प्राथमिकता आहे. या नव्या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवणे आता अधिक सोपे आणि जलद होणार आहे. या सोहळ्याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, पोलीस दल हा समाजाच्या सुरक्षेचा मुख्य आधार आहे. जिल्ह्याला 'नशामुक्त' करण्यासाठी आणि अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी ही वाहने महत्त्वाची भूमिका बजावतील. तसेच, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सागरी सुरक्षेवर भर देताना सांगितले की, किनारपट्टी भागात सीसीटीव्ही यंत्रणा अधिक बळकट केली जाईल. पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात असून, आवश्यक जागा उपलब्ध झाल्यास शासन तातडीने निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, डायल ११२ प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि घटनास्थळी पुरावे गोळा करण्यासाठी या वाहनांची मोठी मदत होईल. जिल्हा नियोजन मधून यासाठी सुमारे ३ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. याच कार्यक्र जिल्हाधिकारी तप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली 'सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशन'ची स्थापना करण्यात आल्याची माहिती देऊन त्याबाबतच्या ठरावाचे प्रमाणपत्रही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.