७६ दिवसांच्या बंदीनंतर देवगडमध्ये मासेमारी हंगामाला हिरवा झेंडा....पूजा-अर्चा करून नौका समुद्रात रवाना; मच्छिमारांमध्ये उत्साहाचे वातावरण
देवगड
७६ दिवसांच्या मासेमारी बंदीनंतर अखेर आज देवगडच्या समुद्रात नव्या मासेमारी हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली. देवगड धक्क्यावर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मासेमारी नौकांना हिरवा झेंडा दाखवून समुद्रात रवाना करण्यात आले.यावेळी नौका मालक, मच्छिमार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे कर्मचारी तसेच सागरी सुरक्षा रक्षक उपस्थित होते. मासेमारी नौकांची विधिवत पूजा करून परिक्रमा करण्यात आली. उपस्थित नौका मालक आणि मच्छिमार बांधवांना पुष्प देऊन नव्या हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर टप्प्याटप्प्याने नौका समुद्राच्या दिशेने रवाना झाल्या.दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची संधी मिळाल्याने मच्छिमारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. देवगडसह परिसरातील अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याने हंगामाच्या सुरुवातीने संपूर्ण सागरी पट्ट्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि भविष्यातील मत्स्य उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने यंदा १५ दिवसांची वाढीव मासेमारी बंदी ठेवण्यात आली होती. या कालावधीत समुद्रातील मत्स्यसाठ्याला वाढीसाठी अधिक वेळ मिळाल्याने आगामी हंगामात चांगले मत्स्य उत्पादन मिळण्याची अपेक्षा मच्छिमारांकडून व्यक्त करण्यात आली. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या या निर्णयाचे स्थानिक मच्छिमारांनी स्वागत केले.अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांनी सर्व नौका मालक व मच्छिमारांना नव्या हंगामासाठी शुभेच्छा देत कायद्याचे तसेच सागरी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. सुरक्षितपणे मासेमारी करून सर्वांना चांगले मत्स्य उत्पादन मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) मासेमारी करणाऱ्या नौकांनी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. EEZ मध्ये मासेमारी करण्यासाठी आवश्यक पास असलेल्या नौकांनीच त्या क्षेत्रात प्रवेश करून मासेमारी करावी. ज्या नौका विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करणार आहेत, त्यांनी आवश्यक पास घेऊनच समुद्रात उतरावे, असे त्यांनी स्पष्ट केले.आजपासून देवगड धक्क्यावरून टप्प्याटप्प्याने नौका समुद्रात रवाना होत असून नारळी पौर्णिमेपर्यंत सर्व नौका मासेमारीसाठी समुद्रात दाखल होतील, अशी माहिती देण्यात आली. सुरक्षितता, शिस्त आणि शाश्वत मासेमारीचा संदेश देत देवगडचा नवा मासेमारी हंगाम उत्साहात सुरू झाला आहे.
konkansamwad 
